वाचन प्रेरणा दिन
वाचन प्रेरणा दिन
शीलं सद्गुणसम्पत्ति: ज्ञानं विज्ञानमेव च ।
उत्साहो वर्धते येन वाचनं तद् हितावहम् ।।
अर्थात - ज्याने चारित्र्य , चांगल्या गुणांची संपत्ती , ज्ञान विशेष ज्ञान आणि उत्साह वाढतो ते वाचन हितकारकच असते.
खरं तर यामुळे ग्रंथ हे आपल्या जीवनाला आकार देणारे असतात. वाचनामुळे मनुष्य सुसंस्कृत होतोच त्याबरोबर जगाकडे पाहत असताना त्याला चांगलं आणि वाईट शोधण्याची एक अलौकिक दृष्टी प्राप्त होते. यामुळे त्याची समृद्ध जीवनाकडे वाटचाल होते.
१५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस निवडला गेला. डॉ. कलमांचे वाचनप्रेम हे सर्वश्रुत आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी , हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी वाचन करावे. लेखनाची प्रवृत्ती प्रबळ व्हावी, कल्पना शक्तीला वाव मिळावा . दुसऱ्याच्या दुःखांची जाणीव व्हावी आणि मन संवेदनशील व्हावे यासाठी वाचन महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून विद्यार्थ्यांनी वाचनासाठी प्रवृत्त होणे ही काळाची गरज आहे.
वाचाल तर वाचाल ' असे म्हटले जाते ते उगीच नाही. सध्या मुले इंटरनेट, गेम्स यांच्या आहारी गेलेली आपणास पहावयास मिळतात. एवढंच नव्हे तर ते मैदानी खेळांकडेही दुर्लक्ष करतात. याचा परिणाम त्यांच्या शरीरावर आणि मनावरही होत असतो. या दोघांना ताळ्यावर आणण्यासाठी वाचन हेच उत्तम आणि रामबाण औषध आहे. आपले जीवन समृद्ध आणि सकारात्मक ठेवण्यासाठी वाचनाची आवश्यकता आहे. म्हणून हे संस्कृत सुभाषित महत्वाचे वाटते .....
वृथाभ्रमणकुक्रीडापरपीडापभाषणे: ।
कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनं श्रयेत ।।
अर्थात - विद्यार्थ्यांने व्यर्थ फिरणे , वाईट खेळ खेळणे, दुसऱ्याला त्रास देणे, वाईट बोलणे यामध्ये वेळ वाया घालवू नये. विद्यार्थ्यांने वाचनाचा आश्रय घ्यावा.
वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविता येतील. आपल्या शाळेतील ग्रंथालयास आपल्या वाढदिवसादिवशी पुस्तक भेट देणे जिनेकरून शाळेत जेवढी विद्यार्थीसंख्या असेल त्या प्रमाणात दरवर्षी ग्रंथालयातील पुस्तकांच्यात वाढ होईल. तसेच इतर ठिकाणी भेटवस्तू देताना याच पद्धतीचा वापर करावा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांनी आपल्या जीवन प्रवासात विविध पुस्तकांचे वाचन केले. त्यांच्या विद्वत्तेचा उपयोग भारतीय राज्यघटना लिहण्यासाठी झाला. 'तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर वाचन करा ' अश्या शब्दात वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले होते. खरं तर' ग्रंथ हे गुरू ' असतात फक्त त्याचा सहवास आपणास अधिकाधिक कसा प्राप्त होईल हे पाहणे गरजेचे असते.
या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण संकल्प करूयात .
- मी माझ्या दैनंदिन जीवनातील काही वेळ अवांतर वाचनासाठी देईन.
- माझ्या आर्थिक नियोजनात पुस्तकांच्या खरेदीचा समावेश करेन.
- माझ्यासोबत मी पुस्तक वाचनासाठी इतरांनाही प्रेरीत करेन.
- एखाद्या विशिष्ट वेळी वाचलेल्या पुस्तकावर मित्र मैत्रिणीसोबत चर्चा करेन.
तर मग चला मित्रांनो, संकल्प करूयात पुस्तके वाचण्याचा , ज्ञानवृद्धीचा आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा.....
धन्यवाद..

Sadya vachan v. Likhan ani maidani khel mulansathi awashyak aahe. Mulana mobile phone pasun door tevayche asel tar vachan.
ReplyDeleteIt's absolutely right sir.. Mulanwar Sanskar karayche astil tar vachan hach uttam paryay aahe.. Sarvangin vikas hawa asel tar Bharpur aani vividh vishayachya vachanashivay paryay nahi.. Great thought and great initiative..
ReplyDeleteChan
ReplyDelete