मुलगी वाचवा



                 
                     बालिका दिन विशेष 
 
मातृदेवो भव । असा संस्कार घडवणारी आपली महान संस्कृती.
स्त्री हाच जीवसृष्टीचा मूलाधार आहे अशी संत महात्म्यांची स्वीकृती
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही काव्यप्रकृती
स्वर्गापेक्षाही माता श्रेष्ठ वाटणे ही प्रभू रामचंद्रांची प्रवृत्ती
शिवबा विनोबा आणि बापूजी हे मानवश्रेष्ठ ही यशाचे श्रेय मातेला देती.

      बापूजी म्हणतात ,' एक माता ही सहस्त्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे , ही माता काय नाही करत ? अनेक भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे , निःस्वार्थीपणे , आपुलकीने , वात्सल्याने पार पाडते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीच असते. ती वेगवेगळ्या रूपाने आपली कर्तव्ये बजावत असते. आई होऊन नयनांचा दिवा आणि तळहाताचा पाळणा करून लेकरांना सांभाळते. त्याच्या कुसुमकोमल मनावर संस्कार घडवते. जिजाऊ होऊन शिवबासारखे थोर राष्ट्रपुरुष घडविते. हिरकणी होऊन बाळासाठी प्राणाची बाजी लावते. लतादीदींसारखी बहीण होऊन भावंडांच्या उत्कर्षासाठी झटते. नूरजहाँ सारखी पत्नी होऊन पतीला श्रेष्ठत्वाला नेते. चाँदबिबी सारखी होऊन वडिलांच्या साम्राज्याचा डोलारा संभाळते. ताराबाई होऊन शत्रूला धूळ चारते. झाशीची राणी होऊन स्वातंत्र्यासाठी लढते. मैत्रिणी होऊन योग्य मार्गदर्शन करते. शिक्षिका होऊन सकलांशी शहाणे करण्याचा वसा घेते.


   
         अशी ही स्त्री रूपे केव्हा अस्तित्वात येतील ? जेव्हा मुलगी जन्माला येईल. कारण मुलगीच्या जन्मबरोबर मातेचा जन्म होत असतो. जी साऱ्या सृष्टीचा मूलाधार आहे.
     
            दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या महान संस्कृती लाभलेल्या देशात स्त्रीला प्राचीन काळी उंबरठ्याच्या आत बंदिस्त केले गेले . तिला शिक्षणापासून वंचित ठेवले. दुय्यम दर्जा देण्यात आला. पण ....... आज काल बदलला आहे. स्त्री शिकून शहाणी झाली आहे. तेव्हाच उंबरठा न ओलांडणारी स्त्री आज पृथ्वीच्या कक्षेपलीकडे अवकाशात पोचली आहे. भाऊ नसला तरी वडिलांचे साम्राज्य मुली समर्थपणे सांभाळत आहेत. कित्येक नामांकित आंतराष्ट्रीय संस्थांचे सारथ्य महिला अधिकारी करीत आहेत. सामाजिक , कौटुंबिक मर्यादा सांभाळून आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि इच्छाशक्तीच्या बळावर आजची स्त्री नवी क्षितीजे ओलांडून जात आहे. तिच्याजवळ निर्णयक्षमता, भावनिकता , सामाजिक भान , वैचारिक लवचिकता आणि जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य आहे.

           असे असूनही आज वर्तमानकाळात स्त्रीजन्मच नाकारला जात आहे . ही अत्यंत संतापजनक अशी बाब आहे. मुलगी जन्माला आली की घरच्या मंडळींच्या काळजाचा ठोका चुकतो. मुलीला जन्म दिलेल्या स्त्रीकडे उपेक्षेने पाहिले जाते. 'ती' या जगात अवतारण्याआधीच तिचा निःपात केला जात आहे. कळी उमलण्यागोदर कुस्करली जाते. फुलपाखरू स्वच्छदी विहारण्याआधीच अळी पायदळी तुडवली जाते. आईवडीलरूपी वृक्षाला लागणारी ही परंबी भविष्यात सुखाची अनेक झाडे फुलवू शकते तिचा अंकुरच खुडून टाकला जात आहे. या क्रूरकर्मी डॉ. मुंडेसारखे कसाई भ्रूणचिकित्सा करून मदत करत आहेत. म्हणूनच आज स्त्रियांची संख्या फार कमी होत चालली आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. नाहीतर इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यावाचून राहणार नाही. पाच पांडवांच्या द्रौपदीसारखी आमच्या कन्यारत्नांची अवस्था व्हायची. 
                         इतर पोस्ट वाचन प्रेरणा दिन
 
    यासाठी समाजाची मानसिकता बदलणे अत्यावश्यक आहे. आजही मुलगा म्हणजे वंशाचा दिवा म्हातारपणीची काठी यावर भर दिला जातो. आणि मुलगी म्हणजे परक्याच धन मानले जाते. दारू पिणारे, पत्ते खेळणारे , चोरी लबाड्या करणारे, रेव्ह पार्ट्या करणारे मुलगे हवेत. ज्याला म्हातारपणाची काठी मानतात ती काठी त्यांच्याच पाठीत घातली तरी स्वतःला धन्य मानणारा हा समाज , पण स्वतः चांदनासारखी झिजून इतरांना सुखरूपी सुगंध देणारी , आंधळ्याची काठी होणारी , प्रसंगी रणरागिणीचे सामर्थ्य राखणारी, प्रेमामृताचे सिंचन करणारी , दोन्ही कुळांचा उद्धार करणारी, अगदी शासनदरबारी सुद्धा कर्तृत्व गाजवणारी मुलगी का नको ?
         
            ही दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा,
            फसू नको तू सावध वाग रे मनुजा जाग ,
             मनुजा जाग....
                   
                     लेखिका - सौ. सुप्रिया सत्यवान गोरेगावकर
                                   शिक्षिका ( गोरेगाव - रायगड )

Comments

  1. मस्त लेख आहे स्त्रियांच विस्तवातील वास्तव सांगण्याचा एक आगळा वेगळा विषय

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल आभारी...

      Delete
  2. Khup chan Usha..Aj kalachi garaj ahe

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रदूषण मुक्त दिवाळी

वाचा ही कथा दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात ?

वाचन प्रेरणा दिन