प्रदूषण मुक्त दिवाळी

                                   

                       प्रदूषण मुक्त दिवाळी



            फटाके  मुक्त  दिवाळीचे  पत्रक  विद्यार्थ्यांना  वाटून   खुर्चीत  बसलो . फटाके मुक्त दिवाळी च्या पत्रकामध्ये  विद्यार्थ्यांनी  फटाके  खरेदी  मध्ये  किती  रुपयांची  बचत  करेन  याची  नोंद  करण्याची  आवश्यकता  होती .  समोरच्या बेंचवरील  मुलगा  त्याच्या  मित्राला  म्हणाला ,' मी  या  वर्षी  फक्त   ५ हजार  रुपयांचे  फाटके  वाजविणार '. त्याचे  हे  बोलणे  ऐकून  मला  आश्चर्य  वाटले  .  मुलांचे  आई  वडील  फटाके  खरेदी  करताना  इतका  खर्च करतात  हे  त्यावेळी  मला  समजले .

             भारतीय  संस्कृती  मध्ये  सणांना  खूप  महत्त्व  आहे  . भारतीय  संस्कृतीची  बीजे  त्यामध्ये  आढळतात आणि  यामधील  सर्वात  मोठा  सण  म्हणजे  दीपावली  होय . या  कालावधीमध्ये  बाजारपेठेत  कोट्यावधींची उलाढाल  होत  असते . विविध  चित्ताकर्षक  वस्तू  विक्रीसाठी  उपलब्ध  असतात  आणि  यामध्ये  फटाके  हे मुलांसाठी  जीव  कि  प्राणच  असतात  , दिवाळीपूर्वी  नुकतीच  सहामाही  परीक्षा  संपलेली  असते .  परीक्षेच्या ताणतणावातून  मिळालेली  मोकळीक  आणि  दिवाळीच्या  सणाचे  आगमन .  मग  मुलांची  लगबग  चालू  होते ती  फटाके  खरेदीची . मला  एवढ्याच  रुपयांचे   फटाके  हवेत . मला  अमुक  प्रकारचेच  फाटके  हवेत  . यात पालक  सुद्धा  आपल्या  मुलांचे  मन  मोडत  नाहीत .  त्यांना  हवे  तेवढे  फटाके  आणतात .  बऱ्याच  वेळा पालकांच्या   मनात नसताना  किवा  आर्थिक  परिस्थिती  नसतानाही  पालकांना  आपल्या  मुलांच्या  आनंदासाठी फटाक्यांच्या  दुकानाची  वारी  करावी  लागते  हे  सत्य  आहे . म्हणून फटाके मुक्त दिवाळी चे पत्रक यासाठी उपयुक्त ठरतात .


           बऱ्याच  वेळा  मुले  ही  फटाके  विकत  घेतल्यानंतर  फटाक्यांशी  छेडछाड  करत  असतात .  ते  फटाके  चुकीच्या  पद्धतीने  हाताळतात.  उदा. न  वाजलेले  फटाके  एकत्र  करून  त्यातील  दारू  काढून जाळणे ,  मोठ्या  क्षमतेचे  फटाके  मडके ,  डबे  इ.  मध्ये  लावणे  यातून  छोट्या  मोठ्या  दुखापती  मुलांना होत  असतात .  भाजण्यासारखे  प्रकार  तर  नेहमी  घडतात . अश्या  वेळी  पालकांनी  पाल्याच्या  सोबत  असणे  महत्वाचे  असते .

         फटाक्यांमध्ये  सल्फर  आणि  पोटॅशियमचे  प्रमाण  मोठ्या  प्रमाणात  असल्याने  दमा , अंधत्व ,  बहिरेपणा ,  तसेच  श्वसनाचे  गंभीर  आजार  उद्भवण्याचा  धोका  असतो  त्यामुळे  फटाके  हे  आरोग्याच्या दृष्टीने  घातक  असतात . सुतळी  बॉम्ब , मोठमोठ्या  फटाक्यांच्या  माळा  ह्या  १२५  डेसिबल  मानकाची  मर्यादा  ओलांडणारे  असतात .  यामुळे  ध्वनिप्रदूषण  वाढते . तसेच  भुईचक्र  सापाच्या  गोळ्या  यासारख्या फटक्यांमध्ये  हवेचे  प्रदूषण  करण्याची  क्षमता  जास्त  असते .   वृद्धलोक , लहान   मुले , ऐकण्याची  क्षमता जास्त  असणारे  कुत्र्यासारखे  प्राणी इ.   ना  फटाक्यांचा  त्रास  मोठ्या  प्रमाणात  होतो  याचा  विचार  व्हावा.

          फटाके मुक्त दिवाळी चा उपक्रम जरी राबवला जात  असला  तरी  फटाके  प्रिय  मुलांसाठी फटाक्यावरती पूर्णपणे  निर्बंध  आणणे  सहज  सोपे  नाही . परंतु  मुलांना  योग्य पद्धतीने  समजून  सांगितल्यास  मात्र  मुलांचे  फटाके  वाजविण्याचे  प्रमाण  कमी  होऊ  शकते .  यासाठी पालक  / शिक्षक  पर्यावरणावरती  फटाके  वाजविण्याचा  होणारा  परिणाम  मुलांना  सांगू  शकतात .  सध्याचे हवामान, ऋतुमान   बदलत  आहे . त्याला  प्रदूषण  हे   कारणीभूत आहे  आणि  हे  प्रदूषण  होण्यास  फटाके काही  प्रमाणात  कारणीभूत  आहेत . आपण  क्षणाचा  आनंद  उपभोगुन  पर्यावरणाची  हानी  करत  असतो. याची    जाणीव  त्यांना  करून  देणे  गरजेचे  आहे.  यामध्ये  कोट्यावधी  रुपयांचा  चुराडा  होत  असून  आजही  काही  लोक  उपाशी  झोपत असतात . हे लक्ष्यात घेणे गरजेचे आहे.


     मुलगा  जर  हजार  रुपयांच्या  फटाक्यांची  मागणी  करत  असेल  तर  पालक  त्याला  ५०० रुपयांचे  फाटके  आणू  आणि  ५०० रुपयांची  तुला  पुस्तके  आणू  असे  म्हणून   त्याची  फटाके  वाजविण्याची  हौस  पूर्ण करू  शकतात  आणि  त्याच्या  ठिकाणी  वाचनाची  आवड  निर्माण  करू  शकतात.  मुलांमध्ये  आपण  लगेच बदलाची  अपेक्षा  करणे  चुकीचे आहे. बदल  करताना  मुलाच्या  मताचा  विचार  करून  त्याचे  मत  कसे चुकीचे  आहे  हे  समजून  सांगावे.  मुलांमध्ये नक्कीच परिवर्तन होईल .  अश्या  प्रकारे  आपण  पैश्याची  बचत करून  पर्यावरण  रक्षण  करू  शकतो . चला तर मग फटाके मुक्त दिवाळी कडे वाटचाल करूया ....... 



इतर पोस्ट वाचण्यासाठी पोस्टवर क्लिक करा...

१)  मुलगी वाचवा भविष्य घडवा 

२) वाचनाचे महत्त्व ....

        
        

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वाचा ही कथा दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात ?

वाचन प्रेरणा दिन