वाचा ही कथा दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात ?
रघुवंशम् मधील ही कथा
महाकवी कालिदासाने रचलेले रघुवंशम् हे काव्य अतिशय प्रसिद्ध आहे. यामध्ये पाचव्या सर्गामध्ये महाराज रघु यांच्या जीवनावरील घडलेल्या घटनेचे वर्णन कवीने केले आहे.
एका तपोवनामध्ये वरतंतु नावाचे अतिशय बुद्धिमान , अध्यापणामध्ये पारंगत आणि स्वभावाने अतिशय दयाळू असे ऋषी राहत होते. आपल्या अध्यापनातील कौशल्याने त्यांनी असंख्य शिष्यांमध्ये संस्कारबीजे रोवली होती. त्यामुळे शिष्यांसोबत त्यांचे एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. याच आश्रमामध्ये पैठणमधील देवदत्त नावाच्या ब्राह्मणाचा मुलगा कौत्स हा विद्यार्जन करण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी तो सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला. आता त्याची आश्रमातून निरोप घेण्याची वेळ आली होती. आपल्याला गुरूने विद्या शिकविल्या, शास्त्रांमध्ये पारंगत केले. यामुळे आपण आपल्या गुरूला काहीतरी देणे लागतो , या भावनेतून तो आपल्या गुरुजवळ गेला आणि कृतज्ञतापूर्वक म्हणाला, "आचार्य , आपण मला अध्यापन करून सर्व विद्यांमध्ये पारंगत केलेत, याबद्दल मी आपणास गुरुदक्षिणा देऊ इच्छितो आपण माझ्याकडून कशाची इच्छा करता ते सांगावे." यावर वरतंतु म्हणाले , " कौत्सा , आपला शिष्य विद्वान झालेला पाहणे यासारखा दुसरा तो आनंद कोणता असू शकतो. मला कोणतीही दक्षिणा नको ." परंतु कौत्साने मात्र वारंवार आग्रह केल्यानंतर वरतंतु म्हणाले, " हे शिष्या, मी तुला १४ विद्या शिकविल्या त्यामुळे तू मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा आण आणि त्या ही तू एकाच व्यक्तीकडून आणाव्यात ."
गुरुची ही अट मान्य करून तो त्या आश्रमातून बाहेर पडला. एकाच व्यक्तीकडून चौदा कोटी सुवर्णमुद्रा मिळविणे कठीण आहे हे त्याला जाणवले. त्यावेळी त्याला रघुराजा हा धनसंपन्न त्याचप्रमाणे विद्वानांचा आश्रयदाता आहे हे त्यास समजले . तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने नुकताच विश्वजीत नावाचा यज्ञ केलेला असून आपली संपूर्ण संपत्ती दान केली आहे असे समजल्यावर कौत्स तेथून निघू लागला. रघुराजाने त्याला अडविले आणि तिथे येण्याचे प्रयोजन विचारले . कौत्स म्हणाला, " हे राजा , मला गुरुदक्षिणा देण्यासाठी चौदा कोटी सुवर्णमुद्रांची आवश्यकता आहे . परंतु या आधीच आपण सर्व संपत्ती दान केली आहे . त्यामुळे मी येथून निघालो आहे." हे ऐकून कौत्साला मदत करण्याचे आश्वासन रघुराजा ने दिले. आणि त्याला आपल्या यज्ञ शाळेत थांबण्यास सांगितले.
रघुराजाने आपली थकीत बाकी इंद्राकडे मागितली . परंतु इंद्राकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने इंद्रासोबत लढण्याची तयारी केली. यावेळी इंद्र रघुराजाला घाबरला आणि त्याने कुबेराला सांगून अयोध्या नगरीबाहेर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. यानंतर रघुराजाने कौत्साला सुवर्णमुद्रा घेण्यास सांगितले. त्यातील त्याने १४ कोटीच सुवर्णमुद्रा घेतल्या बाकी सुवर्णमुद्रा घेण्यास नकार दिला. यानंतर त्या सुवर्णमुद्रा आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आल्या. त्या लोकांना घेऊन जाण्यास सांगण्यात आल्या. ही श्रीमंत होण्याची संधी आहे असे मानून लोकांनी सोने लुटले व दुसऱ्यांना वाटून आनंद साजरा केला. या वेळेपासून आपट्याची पाने वाटण्याची प्रथा रूढ झाली.

Comments
Post a Comment